विरामचिन्हे सर्व प्रकार व्याख्या व उदाहरणांसह

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
11,746

विरामचिन्हे – ‘विराम’म्हणजे विश्रांती अथवा थांबणे.आपण बोलताना मध्ये मध्ये थांबतो.वाचतानासुद्धा वाक्य कोठे संपते,प्रश्न कोठे आहे,उद्गार कोणता,वाक्यात कोठे व किती थांबावे,हे कळले पाहिजे. ते समजण्यासाठी जी चिन्हे वापरली जातात,त्यांना ‘विरामचिन्हे’ असे म्हणतात.

विरामचिन्हांचे प्रकार
विरामचिन्हांचे एकूण ११ प्रकार पडतात.
(१) पूर्णविराम (.)
(२) अर्धविराम (;)
(३) अपूर्णविराम (:)
(४) स्वल्पविराम (,)
(५) प्रश्नचिन्ह (?)
(६) उद्गारचिन्ह (!)
(७) अवतरण चिन्ह (‘ ’) (“ ”)
(८) संयोगचिन्ह (-)
(९) अपसारण चिन्ह (–)
(१०) अवग्रह (ऽऽ)
(११) काकपद (^)

 

(१) पूर्णविराम (.) – वाक्य पूर्ण झाले की वाक्याच्या शेवटी (.) हे चिन्ह वापरतात त्यास पूर्णविराम असे म्हणतात.
उदा. (अ) मी दररोज शाळेत जातो.
(आ)आज दिवाळी आहे.
(इ) माझे जेवण झाले.

(२) अर्धविराम (;) – दोन छोटी छोटी वाक्ये उभयान्वयी अव्ययांनी जोडतात,तेव्हा अर्धविराम (;) वापरतात.
उदा. (अ) गड आला;पण सिंह गेला.
संयुक्त वाक्यातील समान वाक्ये वेगवेगळी दाखवण्यासाठी अर्धविराम (;)वापरतात.
(आ) वडिलांच्या जिवंतपणी त्या उधळ्या मुलाचे काहीच चालले नाही;परंतु वडिलांच्या निधनानंतर मात्र त्याने आपली सर्व संपत्ती उधळून टाकली.

(३) अपूर्णविराम (:) – वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास अपूर्णविराम (:) वापरतात.
उदा. (अ) पुढील उदाहरणे सोडवा.
(आ) पुढील क्रमांकाचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले:६,२,९,१२,५२,

(४) स्वल्पविराम (,) – एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास स्वल्पविराम (,)वापरतात.
उदा. (अ) मला वाघ,सिंह,हत्ती इत्यादी प्राणी आवडतात.
हाक मारून काही सांगताना नावापुढे किंवा संबोधनापुढे स्वल्पविराम (,) वापरतात.
(आ) गौरव,पुस्तक दे.

(५) प्रश्नचिन्ह (?) – वाक्यात प्रश्न विचारलेला असेल;तर वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह (?) वापरतात.
उदा. (अ) तू कोठे गेला होतास ?
(आ) तुझे नाव काय आहे ?

(६) उद्गारचिन्ह (!) – मनातील भावना,आश्चर्य व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या शेवटी उद्गारचिन्ह (!) वापरतात.
उदा. (अ) बापरे ! केवढा मोठा हा हत्ती !
(आ) आहाहा ! किती सुरेख देखावा.

(७) अवतरण चिन्ह (‘ ’) (“ ”) – अवतरण चिन्हाचे दोन प्रकार पडतात .
(अ) एकेरी अवतरण चिन्ह (‘ ’) (आ) दुहेरी अवतरण चिन्ह (“ ”)
(अ) एकेरी अवतरण चिन्ह (‘ ’) – एखाद्या शब्दावर जोर देताना किंवा दुसऱ्याचे मत सांगताना एकेरी अवतरण चिन्ह (‘ ’) वापरतात.
उदा.गांधीजींनी ‘चले जाव’ही घोषणा दिली .
(आ) दुहेरी अवतरण चिन्ह (“ ”)– एखाद्या व्यक्तिच्या तोंडचे शब्द जसेच्या तसे मांडावयाचे असल्यास दुहेरी अवतरण चिन्हाचा (“ ”) वापर करतात.
उदा. दिनेश म्हणाला,“मी आज शाळेत येणार नाही .”

(८) संयोगचिन्ह (-) – दोन शब्द जोडताना संयोगचिन्ह (-) वापरतात.
उदा. आई-वडील
लिहिताना ओळीतील शेवटचा शब्द जर बसत नसेल तर त्याचे दोन भाग करताना संयोगचिन्ह (-) वापरतात .
उदा.महाराष्ट्र हे खूप मोठे राज्य असून महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रकारच्या बोलीभाषा बोल-
ल्या जातात.

(९) अपसारण चिन्ह (–) – वाक्याच्या पुढे तपशील द्यायचा नसल्यास अपसारण चिन्ह (–) वापरतात.
उदा.महाराज तुमचा राजवाडा जळून –

(१०) अवग्रह (ऽऽ) – एखाद्या वर्णाचा लांब (दीर्घ) उच्चार करताना अवग्रहचिन्ह (ऽऽ) वापरतात.
उदा. शी ऽऽऽ

(११) काकपद (^) – लेखन करताना एखादा राहिलेला शब्द लिहिण्यासाठी खूण करण्यासाठी काकपद (^) हे चिन्ह वापरतात.
क्रिकेट
उदा. मी ^ खेळतो .

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम