मराठी व्याकरण – भाषेची ओळख

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
4,539

भाषा 

मानवी मुखयंत्रणेतून निर्माण झालेली ध्वनिचिन्हांनीयुक्त असलेली यादृच्छिक संकेतव्यवस्था म्हणजे ‘भाषा’होय.

व्याकरण

भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला किंवा भाषा शुद्ध करणाऱ्या शास्त्राला व्याकरण असे म्हणतात. व्याकरण हे भाषेच्या पाच मूलभूत घटकांपैकी एक आहे. भाषाशास्त्रानुसार व्याकरण हे एखाद्या नैसर्गिक भाषेतील शब्द, वाक्ये व वाक्प्रचार आदींच्या निर्मितीचे व बांधणीचे नियमन करते.

भारतातील काही प्राचीन लिपी 

ब्राह्मी लिपी 

प्राचीन भारतात वापरली गेलेली एक लिपी आहे. देवनागरीची उत्पत्ती ब्राह्मीवरून झाली. साधारणतः 2500 ते 1500 वर्षांपूर्वीच्या कालखंडात ही लिपी वापरात असल्याचे संकेत आहेत. सम्राट अशोकाच्या काळातील शिलालेख ब्राह्मी लिपीत आढळतात.

साधारण 1500 वर्षांपूर्वी गुप्त साम्राज्यकालात ब्राह्मी लिपीत स्थित्यंतरे होऊ लागली व सहाव्या शतकानंतर या लिपीवरुन अनेक स्थानिक लिप्या तयार झाल्या व त्यांचा वापर सुरू झाल्यावर मूळ ब्राह्मी लिपी लुप्तप्राय झाली.

ब्राह्मी लिपी 
ब्राह्मी लिपी

खरोष्टी लिपी 

ही नॉर्थ सेमेटिक लिपीपासून उत्पन्न झालेल्या ॲरेमाईक लिपीपासून उत्पन्न झाली. सीस्तान, कंदाहार, स्वात, लडाख, तक्षशिला या भागात खरोष्ठी लिपीतील लेख सापडतात. या लिपीला लॅसन यांनी काबुली लिपी, विल्सन यांनी ॲरिऑनिअन, कनिंगहॅम यांनी गांधार लिपी अशी नावे दिलेली आहेत. खरोष्ठी लिपीमधील लेख प्राकृत भाषेत असल्यामुळे तिला बॅक्ट्रोपाली किंवा ॲरिॲनेपाली असेही म्हणतात. पश्चिम पाकिस्तानातील हजारा जिल्ह्यातील मानसेरा व पेशावर जिल्ह्यातील शाहबाजगढी येथे खरोष्ठी लिपीतील अशोकाचे लेख आहेत.

कंदाहारजवळ खरोष्ठी आणि ॲरेमाईक अशा दोन लिपींमध्ये असलेला अशोकाचा लेखही उपलब्ध आहे. मथुरेला कुषाणांच्या राजवटीतील खरोष्ठीचे लेख सापडले आहेत. खरोष्ठीचे लेख धातुचे पत्रे, नाणी, उंटाचे कातडे, भूर्जपत्रे यावर सापडतात. खोतान येथे दुसऱ्या शतकात खरोष्ठी लिपीत लिहिलेले भूर्जपत्रावरील हस्तलिखित सापडलेले आहे. या लिपीत कोणत्याही भाषेतील उच्चार-वैचित्र्य अक्षरांकित करता येते. इ.स. १८३३ मध्ये माणिक्याल येथील स्तूपाचे उत्खनन करतेवेळी जनरल वेंटुरा यांना खरोष्ठी व ग्रीक या दोन्ही लिपींमध्ये नावे असलेली इंडो-ग्रीक राजांची नाणी सापडली व या द्वैभाषिक नाण्यांमुळे नॉरीस आणि कर्नल मॅसन यांना खरोष्ठी लिपी वाचता आली.

खरोष्टी लिपी
खरोष्टी लिपी

देवनागरी लिपी    

ही बऱ्याच भारतीय भाषांची प्रमुख लेखन पद्धती आहे. संस्कृत, पाली, मराठी, कोकणी, हिंदी, सिंधी, काश्मिरी, नेपाळी, बोडो, अंगिका, भोजपुरी, मैथिली, रोमानी इत्यादी भाषा देवनागरीत लिहिल्या जातात. देवनागरी लिपी एकंदरीत देशातल्या व देशाबाहेरच्या एकूण १९४ भाषांसाठी वापरली जाते.

देवनागरी लिपी 
देवनागरी लिपी

देवनागरीची ओळख

मराठी, संस्कृत, हिंदी, कोंकणी, गुजराती, काश्मिरी, सिंधी, नेपाळी आणि रोमानीसारख्या या व इतर काही भारतीय मुळे असलेल्या भाषांची प्रथम लिपी ही देवनागरी आहे. देवनागरी लिपी ही अबुगिडा लेखनपद्धतीमध्ये मोडते. जगातल्या बहुसंख्य लिपींप्रमणे देवनागरीदेखील डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. देवनागरी लिपीचा विकसनकाल हा बराच मोठा असून ह्या लिपीचा ख्रिस्तपूर्व ५०० मध्ये असलेल्या ब्राह्मी लिपीपासून आताची देवनागरी लिपीचा विकास झालेला आहे. साधारणत: इसवी सनाच्या बाराव्या शतकात स्थिरावलेल्या लेखनपद्धतीस देवनागरी असे नांव उपयोजिण्यास आरंभ झाला असावा. प्रत्येक शब्दावर एक रेषा ओढली जाते. तिला शिरोरेषा म्हणतात. तिच्यामुळे लेखन नीटनेटके व सुंदर दिसते. ही एक ध्वन्यात्मक लिपी आहे व त्यामुळे इतर लिप्यांपेक्षा (रोमन, अरबी, चिनी इत्यादी) अधिक वैज्ञानिक आहे.

जगातील विविध भाषांतील बहुतांश शब्द किंवा ध्वनी देवनागरी लिपीमध्ये जवळजवळ जसेच्या तसे लिहिता येऊ शकतात आणि रोमन किंवा इतर लिप्यांपेक्षा देवनागरीत सहज लिहिलेल्या शब्दांचा तुलनात्मकदृष्ट्या हुबेहूब उच्चार करता येतो.

या लिपीत एकूण ५२ अक्षरे आहेत, ज्यात १६ स्वर आणि ३६ व्यंजने आहेत. अक्षरांचा क्रमसुद्धा वैज्ञानिक आहे. स्वर-व्यंजन, कोमल-कठोर, अल्पप्राण-महाप्राण, अनुनासिक-अन्तस्थ-उष्म इत्यादी वर्गीकरणही वैज्ञानिक आहे.

मोडी लिपी 

ही १३व्या शतकापासून २०व्या शतकाच्या मध्यापर्यंत मराठी भाषेच्या लेखनाची प्रमुख लिपी होती.महादेव यादव आणि रामदेव यादव यांच्या राज्यकालात १२६०-१३०९ हेमाडपंत (खरे नांव हेमाद्रि पंडित) या प्रधानाने मोडी लिपीचा विकास केला. छपाईस अवघड असल्यामुळे मोडी लिपीचा वापर मागे पडला आणि बाळबोध (देवनागरी) लिपीचा वापर सार्वत्रिक सुरू झाला. हा वापर सक्तीने करण्याची सुरुवात ई्स्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यानी केली. उर्दूप्रमाणे मोडी लिपी हात न उचलता लिहिली जाते, त्यामुळे वेगाने लिहिणे सोपे जाते. मोडीत अनेक शब्दांची लघुरुपे वापरून कमीतकमी ओळीत सारांश लिहिला जातो.

मोडी लिपी महाराष्ट्रात कमीत कमी ९०० वर्षे वापरात आहे. सर्वांत जुना उपलब्ध मोडी लेख इ.स. ११८९ मधील आहे. ते पत्र पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळाच्या संग्रहात आहे. मोडी लिपी अल्पप्रमाणात का होईना, १९५० पर्यंत लिखाणात प्रचलित होती. शेवटच्या २-३ शतकात मोडी लिपीत अनेक फेरबदल झालेले आहेत. साधारण इ.स. १७००च्या सुमारास चिटणिसी आणि वळणे ही पूर्णपणे प्रगत झाली व यानंतर त्यात फारसे बदल दिसून येत नाहीत. ऐतिहासिक कागदपत्रांतील मोडी लिपी क्लिष्ट आणि वाचण्यास कठीण असते.

मोडी लिपी 
मोडी लिपी

भाषेचे एकुन 5 मूलभूत घटक आहेत.

1) वर्ण  :-

तोंडावाटे बाहेर पडणार्‍या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. ते केवळ ध्वनी असतात; म्हणून त्यांना ध्वनीरूप म्हणतात. ध्वनींची प्रतिके म्हणून जे लेखाकार वापरले जातात त्यांना वर्ण असे म्हणतात.

उदाहरणार्थ :- अ, क, ट इत्यादी

2) अक्षर :-

अक्षर म्हणजे मराठी भाषेतील प्रत्येक वर्णाचा उच्चार होय. कोणत्याही स्वराला किंवा व्यंजनाला मराठी उच्चारीत भाषेत अक्षर असे म्हणतात.

मराठी भाषेतील अक्षरांचे पुढीलप्रमाणे एकूण तीन प्रकारांत विभाजन करण्यात येते :

अ) मात्राविरहित अक्षर किंवा मुळाक्षर :-

मात्राविरहित अक्षर किंवा मुळाक्षर म्हणजे असे अक्षर ज्याला कुठल्याही प्रकारची स्वराची मात्रा लागलेली नसते.

उदाहरणार्थ :- क, ख, ग इत्यादी

ब) मात्रायुक्त अक्षर :-

मात्रायुक्त अक्षर म्हणजे असे अक्षर ज्याला एखाद्या स्वराची मात्रा लागलेली असते.

उदाहरणार्थ :- कि, खु, गे इत्यादी

क) जोडाक्षर :-

ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने एकत्र येऊन शेवटी त्यांत एक स्वर मिसळतो, त्यांस जोडाक्षर असे म्हणतात.

उदाहरणार्थ :- भ्र, त्या, च्या इत्यादी

3) शब्द :- 

दोन किंवा दोनापेक्षा अधिक अक्षरे एकत्र आल्यानंतर जर त्या अक्षरांच्या समूहाला निश्चित असा अर्थ प्राप्त होत असेल, तर त्या समूहाला शब्द असे म्हणतात. याचाच अर्थ असा कि ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त होत असेल, तर त्या समूहाला शब्द असे म्हणतात.

उदाहरणार्थ :-  

  1. कमळ हा एक शब्द आहे.
  2.  चेहरा हा एक शब्द आहे.

वरील उदाहरणांतील कमळ हा अक्षरांचा समूह जर मकळ असा लिहिला तर त्याला काहीच अर्थ प्राप्त होत नाही. त्यामुळे मकळ या अक्षरांच्या समूहाला शब्द म्हणता येणार नाही.  त्याचप्रमाणे चेहरा हा अक्षरांचा समूह जर हचेरा असा आला तर तो अर्थहीन होतो. त्यामुळे हचेरा या अक्षरांच्या समूहाला शब्द म्हणता येणार नाही.

  • अर्थपूर्ण शब्द तयार होण्यासाठी अक्षरांचा क्रम अत्यंत महत्त्वाचा आहे.
  • शब्दाचा अर्थ समजण्यासाठी अक्षरं योग्य क्रमाने आली पाहिजेत.

4) वाक्य :- 

एखाद्या शब्दांच्या समुच्चयाला जर पूर्ण अर्थ प्राप्त होत असेल, तर त्याला आपण वाक्य असे म्हणतो.

नियम क्र. १ वाक्य तयार करण्यासाठी दोन किंवा अधिक शब्दांचा समूह असणे आवश्यक आहे.

नियम क्र. २ – आपण तयार केलेल्या वाक्यामधून संपूर्ण अर्थ स्पष्ट होणे आवश्यक आहे.

उदाहरणार्थ :-

रोहित शाळेत गेला. हे एक अर्थपूर्ण वाक्य आहे. मात्र, रोहित शाळेत इतकंच वाक्य तयार केलं, तर त्यावरून काहीच अर्थबोध होत नाही. म्हणूनच, आपण तयार केलेले वाक्य अर्थपूर्ण असणे आवश्यक असते.

अर्थावरून पडणारे वाक्याचे प्रकार

अर्थावरून वाक्याचे एकूण सहा प्रकार पडतात.

  1. विधानार्थी वाक्य
  2. प्रश्नार्थी वाक्य
  3. उद्गारार्थी वाक्य
  4. आज्ञार्थी वाक्य
  5.  होकारार्थी वाक्य
  6.  नकारार्थी वाक्य

स्वरूपावरून पडणारे वाक्याचे प्रकार

स्वरूपावरून वाक्याचे एकूण तीन प्रकार पडतात.

  1. केवल वाक्य
  2. संयुक्त वाक्य
  3. मिश्र वाक्य

हे  सुद्धा वाचा :- 


 

 

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम